Breaking News

SA vs NEP| नेपाळची झुंज एका इंचाने पडली कमी! चित्तथरारक सामन्यात द. आफ्रिका 1 धावेने विजयी

sa vs nep
Photo Courtesy: X

T20 World Cup 2024 SA vs NEP| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (15 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. ड गटातील या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने दक्षिण आफ्रिकेला (SA vs NEP) कडवी झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद झाल्याने त्यांना एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने चारही साखळी सामन्यात विजय नोंदवला.

सेंट विन्सेंट येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी डी कॉक फक्त दहा धावांचे योगदान देऊन माघारी परतला. तर, कर्णधार मार्करमने 15 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर यांना या सामन्यात अपयश आले. दुसऱ्या बाजूने सलामीवीर रिझा हेन्ड्रिक्स याने 43 धावांची खेळी केली. अखेर ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 27 धावा करत संघाला 115 पर्यंत मजल मारून दिली. नेपाळसाठी कुशल भुरटेल याने सर्वाधिक चार तर दिपेंद्र सिंग याने तीन बळी मिळवले.

विजयासाठी 116 धावांचे आव्हान घेऊन आसिफ शेख व कुशल ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी 7.2 षटकात महत्त्वपूर्ण 35 धावा जोडल्या. कुशलने 13 धावा केल्या. कर्णधार रोहित पोडेल खातेही खोलू शकला नाही. त्यानंतर आलेल्या अनिल सहा याने वेगवान 27 धावा केल्या. यानंतर नेपाळचा डाव गडगडला. दिपेंद्र आरी सहा व आसिफ शेख 42 धावा करून माघारी परतले.

अखेरच्या दोन षटकात नेपाळला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. सोमपाल कामी याने एन्रिक नॉर्किए याला षटकार मारत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या षटकात विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असताना गुलसन झा याने एक चौकार घेतला. शेवटच्या चेंडूंवर दोन धावांची गरज असताना झा हा चेंडू बॅटला लावू शकला नाही व क्विंटन डी कॉक याने त्याला धावबाद केले. यासह दक्षिण आफ्रिकेने फक्त एका धावेने हा सामना जिंकला.

(T20 World Cup 2024 SA vs NEP South Africa Beat Nepal By 1 Run)

सुपर 8 मध्ये एन्ट्री करत USA ने रचला इतिहास! पाकिस्तानची T20 World Cup 2024 मधून घरवापसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version