Breaking News

T20 World Cup| नेदरलँड्सविरूद्ध आफ्रिकेची दमछाक, मिलरच्या संघर्षाने मिळवला निसटता विजय

t20 world cup
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (8 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. नवी वर्ल्डकप रायवलरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (SAvNED) यांच्या दरम्यान झालेला हा सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. केवळ 104 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलर (David Miller) याने जबाबदारीपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासह दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले.

नॅसॉ काऊंटी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पहिल्या षटकात योग्य ठरला. पहिल्या षटकात लेविट व चौथ्या षटकात ओ’डाऊड हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. नेदरलँड्स 12 षटकापर्यंत पाच गडी गमावून पन्नास पर्यंत देखील पोहोचले नव्हते. सायब्रंड एंगेलब्राट (40) व लोगन वॅन बीक (23) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला 103 पर्यंत मजल मारून दिले. ओटनील बार्टमन याने अखेरच्या षटकात तीन बळी घेत एकूण चार बळी मिळवले. तर, एन्रिक नॉर्किए व मार्को जेन्सन यांना प्रत्येकी दोन बळी घेण्यात यश आले.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक याच्या रूपाने धावबाद स्वरूपात पहिला धक्का बसला. दुसऱ्या षटकात रिझा हेन्ड्रिक्स व तिसऱ्या षटकात कर्णधार ऐडन मार्करम बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 3 अशी झाली होती. तर, 12 धावा झाल्या असताना हेन्रिक क्लासेन तंबूत परतला. पहिल्या 6 षटकांत केवळ 16 धावा दक्षिण आफ्रिकेने काढल्या.

संघाला या संकटातून डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स यांनी बाहेर काढले. त्यांनी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्टब्स 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेन्सनही बाद झाल्याने सामना फसतो की काय असे झाले होते. मात्र, मिलरने 19 व्या षटकात डी लीडे याला दोन षटकार व एक चौकार मारत सामना संपवला. त्याने नाबाद 59 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

(T20 World Cup 2024 South Africa Beat Netherlands David Miller Shines)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version