Breaking News

James Anderson 704: क्रिकेट इतिहासातील सुवर्ण अध्याय : जेम्स ऍंडरसन

James Anderson
Photo Courtesy: X/ICC

आज जेम्स ऍंडरसन (James Anderson) थांबलाय! लॉर्ड्सवर आपल्या कुटुंबाच्या समक्ष आणि हजारो चाहत्यांच्या ओठातून “ओहह… जिमी जिमी” ऐकत त्याने आपली 22 वर्षांची झळाळती कारकीर्द संपवली. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात अवघड रोल म्हणून ज्या ‘फास्ट बॉलिंग’कडे पाहिलं जातं, तो रोल एखाद्या लीड ऍक्टरसारखा निभावून जिमी चाललाय. Gen Z म्हटल्या जाणाऱ्या 1998 नंतरच्या पिढीचा तो ‘GOAT’!

(James Anderson GOAT Of Cricket)

जिमीचा वनडे डेब्यू 2002 चा तर टेस्ट डेब्यू 2003 चा. आणि आता त्याची रिटायरमेंट 2024 ची (James Anderson Retirement). या बावीस वर्षाच्या काळात इंग्लंड क्रिकेटचा विचार केला तर, जिमी आपल्या कारकिर्दीत आठ वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला. योगायोगाने या काळात इंग्लंडचे देखील आठ पंतप्रधान होऊन गेले. त्याच्यानंतर डेब्यू केलेले ऍंड्रू स्ट्रॉस आणि ऍलिस्टर कूक 100+ टेस्ट खेळून आणि इंग्लंडचे महान कर्णधार म्हणून रिटायर झाले. जिमीनंतर तब्बल दहा वर्षांनी आलेल्या जो रूटनेही आता 140 कसोटींचा टप्पा पार केलाय.

इंग्लंड क्रिकेटमधील हायलाईट असलेले 21 व्या शतकातील सर्व क्षणांचा जिमी साक्षीदार राहिलाय. स्टीव्ह हार्मिसनचा ऐतिहासिक वाईड, फ्लिंटॉफचे पेडालो प्रकरण, झिम्बाब्वेची झालेली वाताहात, पीटरसन-मूर्स वाद, जमैकातील ऑल आउट 51 असो किंवा ब्रिस्बेनमधील 517-1. चार ऍशेस विन आणि चार ऍशेस पराभव. स्पॉट फिक्सिंग, कोविड आणि बॅझबॉल, हे सगळंच त्याने पाहिलं.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

असं म्हणतात की, मानवी शरीर हे वारंवार फास्ट बॉलिंग करण्यासाठी बनलेलेच नाही. मात्र, काही दिवसांनीच वयाची 42 ही पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जिमीने हे करून दाखवलं. प्रबळ इच्छाशक्ती आणि शिस्तीच्या जोरावर त्याने हे साध्य केलं. अगदी दिवस-दिवस सलग स्पेल टाकल्यानंतर काही वेळा जिमीचे खांदे दात घासताना देखील दुखायचे. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा देशासाठी तो त्याच त्वेषाने मैदानात उतरायचा. थेट सायन्सलाच मागे टाकत वयाच्या तिशीनंतरच त्याने यशाचं खरं टोक गाठलं.

जिमीच्या करियरमधील एक जबरदस्त आकडा असाही आहे की, वयाची तिशी पार केल्यानंतर त्याने तब्बल 116 टेस्ट खेळल्या आहेत. आयुष्याच्या पाचव्या दशकात आला असला तरी आपल्या शेवटच्या टेस्टमध्येही तो स्पीड वाढवताना दिसला. एका वेगवान गोलंदाजाच्या भात्यात असावे असे सर्व अस्त्र-शस्त्र त्याच्याकडे होते. लयबद्ध रनअप, स्मूद ऍक्शन, बोटांमध्ये असलेलं कौशल्य आणि कंट्रोल याच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना नाचवलं.

जिमीने आपल्या करिअरमध्ये कळस गाठला तो जून 2014 ते फेब्रुवारी 2019 यादरम्यान. या काळात त्याने 56 टेस्ट खेळताना, 21 च्या सरासरीने 232 विकेट घेतल्या. सर इयान बॉथम यांना मागे टाकत 384 बळी मिळवत तो इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. पुढे 400 आणि 500 चा टप्पा आरामात गाठत त्याने ग्रेट्समध्ये प्रवेश केला. कोरोना काळात त्याला आपली 600 वी टेस्ट विकेट मात्र चाहत्यांसमोर घेता आली नाही. त्याची भरपाई करण्यासाठी, यावर्षीच भारतात 700 वी विकेट घेण्यासाठी, हिमालयाच्या कुशीतील धर्मशालेची निवड केली. आता 704 या मॅजिक फिगरसह त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. अगदी आठवडाभरापूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून देखील रिटायर झालेल्या जिमीचा तिथेही लास्ट स्पेल होता 7-35 आणि विकेटच्या कॉलममध्ये होता 1126 विकेट्सचा आकडा.

इंग्लंडचा सर्वात यशस्वी वनडे बॉलर कोण? असा प्रश्न विचारला तर अनेक जण गुगल करतील. काहींना वाटेल त्या यादीत जिमी खूप खाली असेल. मात्र, इंटरेस्टिंगली 2015 मध्येच वनडेपासून दूर झालेला जिमी 269 विकेटसह इथेही पहिल्याच नंबरवर आहे. अगदी अढळ!

जेम्स ऍंडरसन आता इंग्लंड क्रिकेटचा भूतकाळ झालाय. मात्र, जेव्हा-जेव्हा त्याचे नाव त्याचे नाव घेतले जाईल, तेव्हा त्याच्यासोबत असेल आणखी एक नाव असणार आहे, त्याचा पार्टनर इन क्रा’ईम स्टुअर्ट ब्रॉडचे. दोघांनी एकसाथ इंग्लंड क्रिकेटची सेवा करताना, सोबतीने 1000 पेक्षा जास्त विकेट्स नावे केल्या. मागील वर्षी ऍशेसनंतर 604 टेस्ट विकेट घेऊन थांबलेला ब्रॉड नसता तर, कदाचित आत्ता जिमीही महानतेच्या त्या शिखरावर पोहोचला नसता. इंग्लंडच नव्हेतर क्रिकेटचेच हिस्ट्री बुक या 8 & 9 शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

जिमीची इंग्लंड संघातील जागा भरून निघणे अशक्य आहे. मात्र, एक गेल्यावर दुसरा येणे हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यानंतर इंग्लंड संघाच्या बॉलिंगचे नेतृत्व ख्रिस वोक्स किंवा मार्क वूड यांच्याकडे येईल. मॅट पॉट्स, गस ऍटकिन्सन आणि ओली स्टोन यांच्या रूपात त्यांच्याकडे उज्वल भविष्य आहे. जोफ्रा आर्चर, ओली रॉबिन्सन किंवा ब्रायडेन कार्स यांच्याकडे देखील बोर्ड पुन्हा पाहू शकते. तरीही, जिमीचे शूज घालणे यापैकी कोणाला शक्य होणार नाही.

दोन दशकांपासून इंग्लंड संघाचा अभिन्न अंग असलेला जिमी खेळाडू म्हणून आता पुन्हा एकदा व्हाईट्समध्ये नसेल. मात्र लगेचच संघापासून दूर जाईल तो जिमी कसला? विंडीजविरुद्धच्या दुसऱ्याच टेस्टपासून तो संघाचा बॉलिंग मेंटर होणार आहे. इंग्लंडच्या नव्या पिढीला ‘रेड चेरी’ची करामत शिकवायला नव्या भूमिकेत तो सज्ज आहे. अगदी तसाच जसा 2003 मध्ये सज्ज झालेला!

Thank You Jimmy!!!

(Article On Cricket Legend James Anderson)

ENG vs WI: इंग्लंडची ऍंडरसनला विजयी विदाई! लॉर्ड्स कसोटीत वेस्ट इंडिज तिसऱ्याच दिवशी गारद

Exit mobile version