Breaking News

INDW vs SAW : महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, एका सामन्यात झाली चक्क ४ शतके

INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऐतिहासिक कामगिरीही घडली. या सामन्यात एक, दोन नव्हे तर चार शतके झाली, जो विश्वविक्रम आहे.

भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृती मंधानाने १२० चेंडूत १३६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान तिने २ खणखणीत षटकार आणि १८ चौकार मारले.  स्मृतीपाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौरने शतकाला गवसणी घातली. हरमनप्रीतने ८८ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १०३ धावा केल्या. या दोघींच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ३ बाद ३२५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनेही शानदार फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्व्हार्ड्ट हिने नाबाद १३५ धावा करत संघाला विजयाच्या नजीक नेण्याचा प्रयत्न केला. या खेळीसाठी तिने ३ षटकार आणि १२ चौकार मारले. तर मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझाने कॅपनेही दम दाखवला. तिने ३ षटकार आणि ११ चौकार ठोकत ११४ धावा फटकावल्या. परंतचु दोघींच्याही शतकी खेळी व्यर्थ ठरल्या. २०व्या षटकात भारतीय पूजा वस्त्राकरने दोन विकेट घेऊन गमावलेली मॅच खेचून आणली.

अशाप्रकारे या सामन्यात स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, मॅरिझाने कॅप आणि लॉरा वोल्व्हार्ड्ट यांनी शतक झळकावले. महिला वनडे सामन्यात प्रथमच चार फलंदाजांनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला गेला. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीत तीन शतकं झळकावली गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version