Breaking News

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास

paris olympics 2024
Photo Courtesy: X/Hockey India

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्समध्ये पदक मिळवण्याची शक्यता असलेल्या भारतीय खेळाडूंची ओळख करून देण्यासाठी, क्रीडा कॅफेने खास मालिका सुरू केलेले आहे.‌ मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पाचवा दावेदार आहे, भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Mens Hockey Team).

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Indian Hockey Team)

टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी शानदार कामगिरी केली होती. तब्बल चाळीस वर्षानंतर भारताला हॉकीमध्ये मेडल मिळालं होतं. पुरुष संघाने कांस्य आपल्या नावे केलेलं. तर, महिला संघाला थोडक्यात पराभूत व्हावे लागल्याने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागलेल. यंदा पॅरिसमध्ये केवळ भारताचा पुरुष संघ आव्हान सादर करेल. मात्र, ते यंदा मेडलचा रंग बदलून, भारतीय‌ हॉकीला सोन्याचे दिवस आणतील अशी अपेक्षा समस्त देशवासीय करत आहेत.

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

ऑलिंपिक्समध्ये भारताची मान कोणत्या खेळाने खऱ्या अर्थाने उंचावली असेल तर तो खेळ म्हणजे हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ म्हटल्या जाणाऱ्या हॉकीने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगभरात आपला डंका वाजवला. मेजर ध्यानचंद या हॉकीच्या जादूगाराने ही प्रतिष्ठा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

भारतीय हॉकी संघाने सर्वप्रथम 1928 ऍमस्टरडॅम ऑलिंपिक्समध्ये भाग घेतला. आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये भारताने थेट सुवर्णपदक पटकावत यशाची मालिका सुरू केली. ही तीच स्पर्धा होती ज्यामुळे ध्यानचंद यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. पुढे 1932 ला अमेरिकेत लॉस एंजेलिस ऑलिंपिक ध्यानचंद यांच्यासह त्यांचे भाऊ रूपचंद यांनी देखील गाजवली. रूपचंद यांचे ऐतिहासिक एकाच सामन्यातील दहा गोल याच स्पर्धेतील. जपानला हरवत भारताने आपले दुसरे ऑलिम्पिक गोल्ड कमावले होते.

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

पुढे 1936 मध्ये बर्लिन येथे झालेली ऑलिंपिक खास लक्षात राहिली. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर ध्यानचंद यांचा खेळ पाहून अक्षरशः अवाक झाला होता. फायनलमध्ये जर्मनीलाच हरवत भारताने सुवर्ण जिंकलेले. तरीही हिटलर याने ध्यानचंद यांचे तोंडभरून कौतुक केलेले. याच स्पर्धेनंतर ध्यानचंद यांनी निवृत्ती स्वीकारली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या या तीनही ऑलिंपिकमध्ये भारताचा झेंडा उंच ठेवण्याचे काम हॉकी संघाने केले.

यानंतर जग दुसऱ्या महायुद्धाच्या विळख्यात अडकले. याच दरम्यान भारत स्वतंत्र देखील झाला. लंडनला 1948 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकला. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्याच ब्रिटिशांना हरवत बलबीर सिंग यांच्या संघाने आपले चौथे गोल्ड कमावले होते. मेजर ध्यानचंद यांचा वारसा घेऊन पुढे चाललेल्या बलबीर यांनी 1952 हेलसिंकी व त्यानंतर 1956 मेलबर्न येथे झालेल्या ऑलिंपिक्समध्येही सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारतीय संघाच्या या सुवर्णमालिकेला अखेर 1960 मध्ये ब्रेक लागला. शेजारी परंतु पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने भारताला हरवत सुवर्ण जिंकलेल. याचा वचपा भारताने लगेचच 1964 टोकियो ऑलिंपिकमध्ये काढत पुन्हा एकदा गोल्ड मेडल आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय हॉकीमधील स्पर्धा वाढल्याने 1968 मेक्सिको ऑलिंपिक व 1972 म्युनिक ऑलिंपिकमध्ये भारताला थेट तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानून, ब्रॉंझ पदरात पाडून घ्याव लागल. पुढे 1976 मॉंट्रियल ऑलिंपिकमध्ये तर भारताला रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं होतं. भारताचा तब्बल 48 वर्षांचा हॉकी मेडलचा प्रवास इथे थांबला होता.

मॉस्को येथे 1980 ऑलिंपिकचे आयोजन झाले होते. त्यावेळी जवळपास सर्वच बड्या हॉकी राष्ट्रांनी स्पर्धेत भाग घेतला नाही. याचाच फायदा उचलत वासुदेव भास्करन यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने स्पेनला हरवत आपले अखेरचे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारताला पुढील ऑलिंपिक मेडल जिंकायला तब्बल 41 वर्ष वाट पाहावी लागली.

टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारतीय संघाने दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत पुन्हा एकदा हॉकीला नवसंजीवनी मिळवून दिली. मनप्रीत सिंग याच्या संघाने कांस्यपदक जिंकले असले तरी, भारतीयांसाठी ते सुवर्णपदकापेक्षा कमी नव्हते. लोकांनी पुन्हा एकदा हॉकीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. आता यावेळी संघ त्याच्या दोन पाऊल पुढे जात, सुवर्णपदक जिंकायचा प्रयत्न करेल.

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

यंदा भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करतोय. जोडीला चार ऑलिंपिकचा अनुभव असलेले मनप्रीत व श्रीजेश आहेत. सध्या भारतीय हॉकीची जगात तुतारी वाजतेय. जर्मनी, ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना भारतीय संघ मात देतोय. त्यामुळे हे खेळाडू देशवासीयांना पुन्हा ‘फिर दिल दो हॉकी को’ म्हणायचे कारण देतील यात कोणालाही शंका नाही.

(Paris Olympics 2024 Hockey)

 

Exit mobile version